manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

हवेचा दाब कसा मोजतात ?

📙 *हवेचा दाब कसा मोजतात ?* 📙
*******************************

आपल्याकडे सभोवती सगळीकडे हवा आहे. वारा वाहतो तेव्हा हवा असल्याचं आपल्याला जाणवतं. एरवी ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तिला काही वजन असेल याची कल्पनाही आपल्याला येत नाही. पण जमिनीपासून थेट आकाशात कितीतरी उंचीपर्यंत हवा असते. त्यामुळे जमिनीवर तिचा सतत दाब पडत असतो. जमिनीच्या एक चौरस मीटरच्या तुकड्यावर हवेचा असा जो स्तंभ उभा असतो, त्याचा जो दाब पडतो त्याला हवेचा दाब म्हणतात. हवामानखातं जेव्हा उद्याच्या किंवा पुढील आठवड्याच्या हवामानाचा अंदाज देतं तेव्हा निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या हवेच्या दाबाची माहितीही दिली जाते. जेव्हा अनपेक्षितरित्या पाऊस येतो तेव्हा कोणत्यातरी ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस पडत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळीच आपल्याला हवेचाही दाब असतो हे आठवतं.

हवेचा हा दाब पास्कल किंवा बार या एककांमध्ये मोजला जातो. पण ते झालं वैज्ञानिक परिमाण. एरवी आपल्याला ओळखीचं असणारं परिमाण म्हणजे पाऱ्याची उंची. जसा रक्तदाब नळीतल्या पाऱ्याच्या उंचीत मोजला जातो तसाच हवेचा दाबही मोजला जातो. यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राला बॅरोमीटर असं म्हणतात. त्यात एका भांड्यात पारा ठेवून त्यात एक उलटी नळी ठेवलेली असते. त्या नळीतील हवा काढून घेतलेली असल्याने तिच्यात निर्वात पोकळी निर्माण झालेली असते. भांड्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या हवेच्या दाबामुळे पारा त्या नळीत चढतो. नळीतल्या पार्‍याचं वजन आणि त्या भांड्यातल्या नळीच्या तोंडाच्या क्षेत्रफळाएवढ्या जागेवरच्या हवेचं वजन समान असतं. त्यामुळे नळीतल्या पाऱ्याची उंची ही त्या हवेच्या दाबाचं माप असल्याचं धरलं जातं. सामान्यत: समुद्रसपाटीवर पाऱ्याची उंची ७६० मिलिमीटर असते. तोच हवेचा दाब मानला जातो. एका चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळावरच्या हवेचा दाब एक किलोन्यूटन असतो.

हे अर्थात अतिशय प्राथमिक स्वरूपाचं बॅरोमीटर झालं. हवेचा दाब मोजावयास सुरुवात झाली तेव्हा अशा यंत्राचा वापर होत असे. आजकाल याच तत्त्वावर आधारित पण अचूक मोजमाप करणारी इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर्स उपलब्ध आहेत.

जसजसं उंचावर जावं तसतशी हवा विरळ होते. सहाजिकच तिथं हवेचा दाब घसरत जातो.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*