manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

अग्नीचा शोध केव्हा लागला ?

🔥 *अग्नीचा शोध केव्हा लागला ?* 🔥
******************************

अग्नीचा शोध हा मानवाच्या सांस्कृतिक, वैज्ञानिक प्रगतीतला पहिला टप्पा मानला जातो. इंग्रजीत इन्व्हेन्शन आणि डिस्कवरी असे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत. त्याला पर्यायी समानार्थी म्हणून मराठीत शोध हा एकच शब्द योजला जातो. इन्व्हेन्शन हे अशा एखाद्या उपकरणाचं किंवा वस्तूचं असतं की जी त्यापूर्वी कधी अस्तित्वातच नव्हती. ती संपूर्णपणे मानवनिर्मित असते. म्हणूनच विजेच्या दिव्याचं इन्व्हेन्शन एडिसननं लावलं असं आपण म्हणतो. एडिसनपूर्वी विजेचा दिवा ही काय चीज आहे याची माहितीच नव्हती. पण गुरुत्वाकर्षणाचं तसं नाही. ते या जगाच्या प्रारंभापासून अस्तित्वात आहे. त्याच्या ओढीची प्रचिती क्षणोक्षणी सर्वांना येत असते. पण न्यूटनमहाराजांच्या मस्तकावर ते प्रख्यात सफरचंद पडेपर्यंत त्या गुढाची उकल झाली नव्हती. तसंच या नैसर्गिक आविष्काराची उपपत्ती आणि नियम यांची माहिती नव्हती. ती न्यूटनमहाशयांनी करून दिली, म्हणून त्या शोधाचं श्रेय आपण त्यांना देतो.

अग्नीचा शोध हा या दुसऱ्या प्रकारात मोडणारा शोध आहे. आकाशातली वीज कोसळून वणवा पेटल्याचं आदिमानवानं पाहिलं होतं. त्याच्या आकाशाला भिडू पाहणाऱ्या लपलपत्या जिभांनी तो भयभीतही झाला होता. त्यामुळे अग्नीची ओळख त्याला होती. पण आपल्याला हवा तेव्हा तो कसा प्रज्वलित करायचा हे त्याला माहीत नव्हतं. ते कसब त्यानं हस्तगत केलं तेव्हा त्यानं अग्नीचा शोध लावला, असं म्हणायला हवं. पण हे नेमकं केव्हा झालं ?

ते आजवर नक्की सांगता येत नव्हतं. पण अलीकडेच वैज्ञानिकांच्या दोन गटांना वेगवेगळ्या ठिकाणी काही पुरावे मिळाले आहेत. इस्रायलमधील वैज्ञानिकांना गेशार बेनाॅत यॅकाॅव्ह या पाणथळ जागी उत्खननात काही गारगोट्यांपासून तयार केलेली आयुधं मिळाली. त्यातली काही अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती. त्या बरोबरच्या न जळालेल्या आयुधांपेक्षा ही वेगळ्या ठिकाणी होती. त्यांचे जुडगे एकाच ठिकाणी एकत्र सापडले होते. त्यामुळे त्या ठिकाणी आदिमानवांच्या टोळ्यांनी शेकोट्या पेटवल्या असाव्यात असं अनुमान या वैज्ञानिकांनी काढलेलं आहे. या गारगोट्या सात ते आठ लाख वर्षांपूर्वीच्या होत्या असंही त्या वैज्ञानिकांना आढळून आलं. त्यामुळे त्या सुमारास अग्नीचा शोध लागला असावा असा त्यांचा कयास आहे. तरीही या शेकोट्याच होत्या आणि वीज कोसळून पेटलेले वणवे नव्हते असं खात्रीलायक कसं सांगता येईल, असा सवाल केला गेलाच. त्याचं उत्तर त्याच ठिकाणी सापडलेल्या अर्धवट जळालेल्या काटक्यांवरून देता येतं. या काटक्या ऑलिव्हे, बेरी यासारख्या नेहमीच्या आहारातल्या फळझाडांच्याच होत्या. जर वणवा असता तर सर्व प्रकारची लाकडं सापडायला हवी होती.
या अनुमानाची पुष्टी आफ्रिकेतील स्वार्तक्रान्स जागी सापडलेल्या अवशेषांनी केली आहे. तिथं तर काही जळालेली हाडं सापडली. या शोधाने माणसाला अन्न भाजून खाण्याची सवय लागली. आपल्या गृहांसमोर जाळ पेटवून वन्य प्राण्यांपासून आणि थंडीपासूनही आपलं संरक्षण करायला तो शिकला. त्याच्या जीवनक्रमात क्रांतीच घडून आली.

*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*