manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Thursday, May 14, 2020

जोतीराव गोविंदराव फुले



*🔵जोतीराव गोविंदराव फुले🔵*





 (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. येथील जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती; जनता त्यांना महात्मा फुले म्हणे.

*🔵बालपण आणि शिक्षण🔵*

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.


*🔵शैक्षणिक कार्य🔵*


महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

“ विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।


बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची

ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली.जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. महात्मा फुले हे थोर नेते होऊन गेले आहे. त्यांनी मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यांच्यामध्ये जागृती निर्माण केली.

*🔵सामाजिक कार्य🔵*

मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची
(अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्‍याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

*🔵सत्यशोधक समाज🔵*

२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा
दिला.तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

*🔵लेखन साहित्य🔵*

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसर्‍या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

*🔵लेखन🔵*

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-

इ.स.१८५५ नाटक तृतीय रत्‍न
जून, इ.स. १८६९ पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा

जून इ.स. १८६९ पवाडा विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी
इ.स.१८६९ पुस्तक ब्राह्मणांचे कसब

इ.स.१८७३ पुस्तक गुलामगिरी
सप्टेंबर २४ , इ.स. १८७६
अहवाल सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत

मार्च २० इ.स. १८७७ अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट
एप्रिल १२ , इ.स. १८८९ निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ

२४ मे इ.स. १८७७ पत्रक दुष्काळविषयक पत्रक
१९ ऑक्टोबर इ.स. १८८२ निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन

१८ जुलै इ.स. १८८३ पुस्तक शेतकर्‍याचा असूड
४ डिसेंबर इ.स. १८८४ निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत

११ जून इ.स. १८८५ पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र
१३ जून इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक १
ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक सत्सार अंक २

१ ऑक्टोंबर इ.स. १८८५ पुस्तक इशारा
२९ मार्च इ.स.१८८६ जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर

२ जून इ.स. १८८६ पत्र मामा परमानंद यांस पत्र
जून इ.स. १८८७ पुस्तक सत्यशोधक सामाजोक्त मंगलअष्टकासह सर्व पूजा-विधी
इ.स. १८८७ काव्यरचना अखंडादी काव्य रचना

१० जुलै इ.स. १८८७ मृत्यू पत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र

*🔵पश्चात प्रभाव (लीगसी)🔵*

महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ महाराष्ट्रात रुजवण्यासाठी दिनकरराव जवळकर व केशवराव जेधे यांनी खूप मेहनत घेतली. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना समाजप्रबोधनासाठी मदत केली. ब्राम्हणेतर चळवळीसाठी जेधे-जवळकर जोडीने अवघा महाराष्ट्र ढवळून काढला.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही फुले आणि आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते. जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी ’महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. जोतिबांच्या जीवनावर ’असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.

जोतिबा महात्मा फुले’ नावाचा आणखी एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढत आहेत. त्यात संदीप कुलकर्णी महात्मा फुले असतील आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारतील.

जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या नावचे पुरस्कारही अगणित आहेत.