manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

अंतराळवीर अन्न कसं पचवतात ?

👩🏼‍🚀 *अंतराळवीर अन्न कसं पचवतात ?* 👩🏼‍🚀

आपल्याला आपण खाल्लेलं अन्न पचवताना जड जात नाही. आपल्या शरीराची ती एक अनैच्छिक क्रिया आहे. म्हणजे अन्नपचन आपोआप होत असतं. त्यासाठी सामान्यतः आपल्याला काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागत नाहीत. मग अंतराळवीरांच्या बाबतीत हा प्रश्न का उठावा ? सर्वसामान्यपणे अंतराळात गुरुत्वाकर्षण नसतं असा समज आहे. अंतराळवीरांना आपल्या यानात तरंगत असताना टीव्हीवर पाहत आपण पाहिलेलं असतं. तिथे जर काडी पेटवून ज्योत निर्माण केली तर ती वर उफाळत नाही. तिथल्या तिथंच घोटाळत राहते. त्यामुळे अन्न, पाणी सगळंच तरंगत असणार असं आपण समजतो. ते तसं खरंही आहे. म्हणूनच मग, अंतराळवीर पाणी कसं पितात ? प्यायलेलं पाणी ते खाल्लेल्या अन्नाचा गोळा खाली पोटात कसा उतरतो ? असा प्रश्न पडतो. आणि अन्न पचण्यासाठी ते आधी जठरात उतरायला हवं. तसं झालं तरच तिथं मग अन्नपचनाच्या रासायनिक प्रक्रियेला सुरुवात होईल. म्हणूनच हा प्रश्न आपल्याला पडतो.

खरंतर जमिनीवरही केवळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापोटी आपण घेतलेला घास जठरात उतरत नाही. आपल्या अन्ननलिकेला जोडलेले स्नायू आकुंचन प्रसरण पावत तो पुढंपुढं सरकवत राहतात. तेव्हा अंतराळातही स्नायूंची तीच प्रक्रिया पार पडत असते. अन्न घन असतं. आपण तोंडात सरकवत असतो. नुसतंच हवेतून ते तोंडात पडत नाही. तिथंही ते चावलं जाऊन लाळेत मिसळतं आणि मगच तो लगदा पुढं सरकतो. अंतराळातही तीच प्रक्रिया पार पार पडते. त्यात कोणतीही अडचण येत नाही. पण पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ पिताना काही वेळा गुरुत्वाकर्षणाचा प्रभावच कारणीभूत ठरतो. तर त्यासाठी तो द्रवपदार्थ स्ट्रॉसारख्या नळीतून तोंडात ओढून घेता येतो आणि पुढंही मग केवळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली त्याची पुढची वाटचाल न होता अन्ननलिकेच्या स्नायूंच्या करामतीपोटी तो जठरात उतरतो.

अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या बलाची मात्रा क्षीण असते, त्यामुळे अंतराळवीरासकट सगळ्याच गोष्टी तरंगतात. त्यामुळं जेवणाचं ताट किंवा त्यातले पदार्थ तरंगत दूर जाऊ नयेत म्हणून ते घट्ट धरून ठेवावे लागतात. जशी तूप साखर पोळी खाताना ती गुंडाळी आपण धरून ठेवतो तशी. तेवढी बाब सांभाळली की अंतराळातलं क्षीण गुरुत्वाकर्षण अन्नपचनाच्या आड अजिबात येत नाही.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*