manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

झाडांची पानं का गळून पडतात ?

🍂 *झाडांची पानं का गळून पडतात ?* 🍂

निसर्ग मोठा काटकसरी आहे; आणि त्याचं नियोजनही बंदिस्त असतं. झाडांच्या पानांचं एक काम जसं प्रकाशसंश्लेषणाचं असतं तसंच ते झाडातलं अतिरिक्त पाणी बाहेर टाकून देण्याचं असतं. एक प्रकारे झाडांचा हा उच्छ्वासच असतो. जमिनीतीलं पाणी मू़ळं शोषून घेतात. त्याचा जो काही वापर आवश्यक असतो तो होत होत ते पाणी पानांपर्यंत पोहोचतं. तिथं त्याचा संयोग हवेतल्या कार्बनडायआॅक्साइडशी होतो. सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या मदतीनं या संयोगातून कर्बोदकं म्हणजेच पिष्टमय पदार्थ निर्माण होऊन ते झाडांमध्ये साठवले जातात. उरलेलं पाणी मग पानाकडून बाष्पाच्या रूपात हवेत सोडलं जातं. मात्र, हिवाळा आला की सूर्यप्रकाशही कमी होतो आणि जमिनीमधून शोषल्या जाणाऱ्या पाण्याच्या मात्रेतही घट होते. सहाजिकच उपलब्ध पाण्याच्या बचतीला महत्त्व येतं. त्यामुळं मग पावलांकडून ते हवेत टाकलं जाणार नाही, याची व्यवस्था करावी लागते. पानांवर सोपवलेल्या दोन्ही कामांमध्ये आता मंदी आल्यामुळे पानांची तेवढीशी आवश्यकता आता उरत नाही. तेव्हा ती गळून पडणंच सोयीचं ठरतं. शिवाय काही काळ सतत काम करत राहिल्यामुळं पानंही 'म्हातारी' झाल्यासारखी होतात. सहाजिकच ती काढून टाकून त्यांची जागा नवी कोरी पानं घेतील अशी व्यवस्था करावी लागते. त्यासाठी मग अशी अवस्था होण्यापूर्वीच पानाच्या देठाच्या मुळाशी मऊशार पेशींची गर्दी होते. त्यातून एक विशिष्ट विकर पाझरायला लागतं. ते त्या देठाच्या खुडण्याला मदत करतं आणि पान हळुवारपणे अलगद गळून पडतं.

वर्षाचे सहा सात महिने सतत काम करताना काही विषमय पदार्थही पानांमध्ये साचून राहतात. पानं गळून पडल्यानं या घातक पदार्थांचा निचरा व्हायलाही मदत होते; पण अशा प्रकारे सर्वच झाडांची पाने गळून पडत नाहीत. सदाहरित झाडांची अशी विशिष्ट ऋतूमध्येच पानगळ होत नाही. उलट त्यांच्या पानांचं नवीनीकरण सततच होत असतं. त्यामुळं वर्षभर सर्वच ऋतूंमध्ये ती हिरव्यागार पानांनी बहरलेली दिसतात.