manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

थकवा का येतो ?

😰 *थकवा का येतो ?* 😰
"""""""""""""""""""""""""""""""""""""

काही काही शब्द आपण सहजपणे वापरतो. 'थकलो रे आज' असं म्हणणं त्याच जातकुळीतलं आहे. कारण काहीही न करता काही मंडळींना थकायला होत असतं. पण इथं आपल्याला ज्या थकव्याचा विचार करायचा आहे तो अंगमेहनतीचं काम केल्यानंतर येणारा. सकाळी जॉगिंग करणाऱ्याला काही विशिष्ट अंतरानंतर थकवा जाणवायला लागतो किंवा तालमीत जोर बैठका काढणार्याला किंवा वजन उचलण्याचा व्यायाम करणाऱ्यालाही थकवा जाणवायला लागतो. भर उन्हात शेतकी खेळ करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीलाही शतक पूर्ण करता करताच थकवा जाणवायला लागतो. तो का ?

अंगमेहनतीचं काम करताना आपण आपल्या शरीरातल्या स्नायूंना कामाला लावत असतो. हे काम करण्यासाठी अर्थात स्नायूंना ऊर्जेची गरज भारत भासते. ती एटीपी या रसायनातून त्यांना मिळते. अंगातल्या ग्लुकोज या इंधनाचं ज्वलन झालं की त्या जीवारासायनिक प्रक्रियेतून एटीपीची निर्मिती होते; पण त्या ज्वलनासाठी सहाजिकच ऑक्सिजनची गरज असते. रक्तातून त्याचा पुरवठा होतो; पण आपण स्नायूंना अधिक वेगानं काम करायला लावलं की त्याची ऑक्सिजनची गरजही वाढते. ती हृदय, अधिक वेगानं काम करून पुरवतं. आपल्या श्वासोच्छवासाचा वेगही वाढवावा लागतो; पण याला मर्यादा असते. स्नायूंचा काम करायचा वेग त्या मर्यादेपलीकडे वाढला की मग या प्रक्रियेकडून होणारी एटीपीची निर्मिती पुरेशी पडत नाही.

तसं झालं की शरीर एटीपीचे उत्पादन करणाऱ्या पर्यायी ऑक्सीजनविरहित प्रक्रियेला चालना देतं. त्या प्रक्रियेत ग्लूकोज ऐवजी शरीरात साठवलेल्या ग्लायकोजेनचा इंधन म्हणून वापर केला जातो. त्या प्रक्रियेत ग्लायकोजेनचे ग्लुकोज आणि पायरुव्हिक आम्ल या दोन घटकांमध्ये विभाजन होतं. त्यातल्या पायरुव्हिक आम्लाचं रूपांतर मग लॅक्टिक आम्लात होतं. आपल्या भाषेत याला दुधाचं आम्ल म्हणायला हरकत नाही.

हे लॅक्टिक आम्ल स्नायूंना विषासारखं असतं. त्यांच्या आकुंचन प्रसारणाच्या क्रियेत बाधा अाणतं. लॅक्टिक आम्ल जसजसं साठत जातं तसतसे जास्तीत जास्त स्नायू त्याच्या प्रभावाखाली येतात. त्यांची काम करण्याची क्षमता घटत जाते. त्या आम्लाचा निचरा करणारी यंत्रणा कामाला लागते. त्यामुळे ते आम्ल रक्तात उतरतं. त्यातून मग ते जे स्नायू प्रत्यक्ष काम करत नसतात त्यांच्यापर्यंतही पोहोचतं. तसं झालं की ते स्नायूही आखडल्यासारखे होतात.  आपल्याला थकवा जाणवायला लागतो.

उत्तम खेळाडू अर्थात नियमित व्यायाम करून आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवत असतात. त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन पुरविण्याचे काम ते अधिक काळ करू शकतात. साहजिकच त्यांच्या शरीरात लॅक्टिक आम्ल जमायला वेळ लागतो. त्यांना लवकर थकवा जाणवत नाही. त्यांचा दम अधिक टिकतो.

*बाळ फोंडके यांचा 'का ?' या पुस्तकातून*