manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Saturday, May 23, 2020

गुणसूत्रे (DNA)

📙 *गुणसूत्रे (DNA) म्हणजे काय ?* 📙

मानवाच्या पेशीत केंद्रक वा भोवतीचा द्रव असे दोन घटक असतात. पेशीतील केंद्रकात डीऑक्सिरायबो, न्यूक्लेइक आम्ल हा कार्बनी रेणू असतो. या रेणूची रचना खालीलप्रमाणे असते.
त्यात दोन साखळ्या एकमेकींत गुंतलेल्या असतात. या द्रव्यात अॅडेनीन, ग्वानीन, सायटोसिन व थायमिन तसेच डीऑक्सीरायबोज ही शर्करा असते. एका साखळीत अॅडेनीन, ग्वानिन, असल्यास तिच्या विरुद्ध साखळीत या घटकांशी दुवा साधणारे थायमिन व सायटोसिन असतात. पेशींचे सर्व संदेश या द्रवांच्या विशिष्ट रचनेच्या सांकेतिक भाषेत असतात. प्रथिने तयार करणे, रंग ठरवणे, डोळ्यांचा रंग ठरवणे, केसांचा प्रकार ठरवणे हे सर्व या द्रव्यांच्या तीन तीन अशा विशिष्ट रचनेवर अवलंबून असते. या विशिष्ट रचनांना गुणसूत्रे वा जनुक असे म्हणतात. अनेक गुणसूत्रांच्या समुच्चयाला रंगसूत्रे असे म्हणतात.
 गुणसूत्रांवर आपला रंग, नाकाचा आकार (चाफेकळी वैगरे) उंची, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग इत्यादी ठरत असते. साहजिकच काही रोगांमुळे म्हणा वा अन्य कारणांमुळे या गुणसूत्रांवर विपरीत परिणाम झाला, तर जन्मजात वैगुण्ये निर्माण होतात. अनुवांशिक आजार देखील या गुणसूत्रातील गुणांमुळेच होतात. मधुमेह, रक्तदाब, मनोविकार असे अनुवांशिक रोग गुणसूत्रांमुळेच एका पिढीतून दुसऱ्या पिढीला होतात.
लिंग ठरविणाऱ्या गुणसूत्रांच्या समुच्चयाला लिंगसूत्रे असे म्हणतात. मानवी शरीरातील सर्व पेशीत ४६ रंगसूत्रे असतात. त्यापैकी दोन लिंग सूत्रे असतात. पुरुषांत X, Y ही लिंगसूत्रे तर स्त्रीत X, X ही लिंगसूत्रे असतात. फलनाच्या क्रियेत शुक्राणू व स्त्रीबीजाचे मीलन होताना पुरुषांकडून २२X वा २२Y अशी रंगसूत्रे स्त्रीला मिळतात. स्त्रीकडून २२X हीच रंगसूत्रे येतात व त्यांच्या संयोगाने अनुक्रमे ४४XX म्हणजे मुलगी किंवा ४४XY म्हणजे मुलगा जन्माला येतो. यावरून मुलगा होणार की मुलगी यासाठी पुरुषाची लिंगसुत्रेच जबाबदार असतात. अशी ही गुणसूत्रे मानवी शरीराच्या वाढीचा विकासाचा जणू साठवून ठेवलेला गोषवाराच !