manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, May 13, 2020

कृष्णविवर कसं पाहतात ?

🎇 *कृष्णविवर कसं पाहतात ?* 🎇

आइन्स्टाइनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार कृष्णविवराची घनता इतकी प्रचंड असते, की त्यापायी त्याच्या ठायी असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या बलातून कोणाचीही सुटका होत नाही. प्रकाशकिरण त्यात जखडून पडतात. ते तसे बाहेर न पडल्यामुळे अर्थात ते दिसण्याची शक्यता मावळते. मग ते एखाद्या ठिकाणी असल्याचं आपल्याला समजतच कसं ? एखाद्या कोळशाच्या वखारीत लपलेल्या काळ्या मांजराला बघण्याइतकंच हे कठीण आहे अशी मल्लीनाथी स्टीफन हॉकिंगनंच केली आहे.

तरीही या विश्वात असलेल्या कितीतरी कृष्णविवरांचा छडा वैज्ञानिकांनी लावला आहे. हे साध्य करण्यासाठी चार निरनिराळी तंत्र उपलब्ध आहेत. त्यापैकी एकाचा वापर करून कृष्णविवर बघता येतं.

जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होऊन त्याचं कृष्णविवरात रूपांतर होतं, त्यावेळी त्याच्या गुरुत्वाकर्षणात कोणताही बदल होत नाही. ते पूर्वीइतकंच राहतं. त्यामुळे त्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या ग्रहांच्या कक्षेतही काहीही बदल होत नाही. ते पूर्वीसारखेच आणि पूर्वीच्या वेगानंच आपली भ्रमंती करत राहतात. त्यामुळे कोणताही तारा नसलेल्या केंद्रकाभोवती असं एखादं ग्रहमंडळ घिरट्या घालत असलेलं दिसलं की तिथं कृष्णविवर असण्याची शक्यता असते.

कृष्णविवराच्या तीव्र गुरुत्वाकर्षणाच्या ओढीपायी आसपासचे वायू आणि वायुंचे ढग त्याच्याकडे जोराने खेचले जातात. ही खेच इतकी जोरकस असते की त्या वायूंचं तापमान मोठ्या प्रमाणावर वाढतं. त्यापायी मग त्या वायूंकडुन क्ष किरणांचं उत्सर्जन होतं. त्यांची नोंद घेऊन कृष्णविवराच्या अस्तित्वाचा थांगपत्ता लावता येतो.

कृष्णविवराच्या घनतेपायी ते एखाद्या भिंगासारखं काम करतं. जर आपण एखादी वस्तू आणि आपले डोळे यांच्यामध्ये भिंग धरलं तर त्या वस्तूवरून येणार्‍या प्रकाशकिरणांचं त्या भिंगांकडून वक्रीभवन झाल्यानं ती वस्तू आहे त्यापेक्षा मोठी दिसते. तसंच जर एखादं कृष्णविवर एखादा तारा आणि आपण यांच्यामधून गेलं तर त्या ताऱ्याकडून येणार्‍या प्रकाशाचीही तीच गत होते आणि त्या ताऱ्याचं तेज आकस्मात वाढतं. त्यावरूनही कृष्णविवराची माहिती मिळते.

कृष्णविवराची घनता प्रचंड असते. त्यामुळे लहानशा क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमानाची दाटीवाटी झालेली असते. त्यामुळे अवकाशातील वस्तुमानाचं मोजमाप करताना एखाद्या जागी जर अशी मोठ्या प्रमाणावर अदृश्य वस्तुमान असल्याची सूचना मिळाली, तर तिथं कृष्णविवर असल्याची शक्यता बळावते.

*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून*