manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Sunday, June 7, 2020

क्रांतिवीर मंगल पांडे

                    *क्रांतिवीर मंगल पांडे*


  *जन्म : 19 जुलै 1827*  (नगवा, फैजाबाद, उत्तर प्रदेश)

 *फाशी : 8 एप्रिल1857*
 (बराकपूर, कलकत्ता, प. बंगाल)

            मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते.
      ज्यावेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली त्यावेळी ते २२ वर्षांचे  होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४ व्या तुकडीच्या ५ व्या कंपनीत कंपनीत काम करत होते.  कलकत्त्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे.  अशा वेळी या आवरणाला लावलेली गाई वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले.  इतकेच नव्हे तर, प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिका-यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला . त्यांनी ब्रम्हदेश ( म्यानमार ) हून गो-या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला नि:शस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलुन द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले . या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहका-यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.
      ३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या  पलटणीतील स्वदेश बंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही . २९ मार्च १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत
ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुध्द देशी सैनिकांना उत्तेजित करु लागले. "मर्दहो, उठा!" अशी गर्जनाकरुन ते सैनिकांना म्हणाले, "आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे!! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रुचा निःपात करा !!"
     हे पहाताच सार्जंट मेजर ह्युसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली, पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून हयुसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बाॕ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली .घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले, पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले .
     एवढ्यात शेख पालटू नावाचा मुसलमान शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा, असे मंगल पांडे यांना वाटले, पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले. "आम्ही मंगल पांडेच्या केसालासुद्धा हात लावणार नाही .हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे गोच्या अधिका-यांचे रक्त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार हे पहाताच त्यांनी बंदक आपल्या छातीकडे रोखली व स्वत:वर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले. त्यांची शुध्द हरपली. नंतरच ब्रिटिश सैनिक त्यांना पकडू शकले. जखमी झालेल्या मंगल पांडे यांना सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. आठवडाभरातच त्यांच्यावर महाभियोग चालविण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलिकडे निष्ठा ठेवणा-या  या तरण्याबांड क्षात्रविराला न्यायालयाने इतर कटवाल्यिंची नावे विचारली, परंतू  मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.  आपल्या देशबांधवाच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण
देणा-या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की सा-या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग मिळेना. शेवटीया घाणेरड्या  कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी नि:शस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.  त्याच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की, या क्रान्तियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज 'पांडे' याच नावाने संबोधू लागले.
     भारत सरकारने ५ ऑक्टोबर १९८४ रोजी पांडेंची प्रतिमा असलेली टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला.  तिकीट व प्रथम - दिवसांचे कव्हर दिल्लीचे कलाकार सी. आर. पाखराशी यांनी तयार केला होता.           पांडे यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ला केला आणि नंतर फाशी देण्यात आली त्या जागेवर शहीद मंगल पांडे महा उद्यान नावाच्या एका पार्कची उभारणी बराकपर येथे करण्यात आली आहे.

                     🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳