manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Wednesday, September 23, 2020

मादाम भिकाजी रुस्तुम कामा

 ********************************

* भारतीय क्रांतिकारक महिला भिकाजी रुस्तुम कामा *

********************************


जन्म - २४ सप्टेंबर १८६१

स्मृती - १३ ऑगस्ट १९३६


मादाम भिकाजी रुस्तम कामा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.


मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.


दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले. त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. 


सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम कामांनी त्यांना मदत केली. त्या स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्‍या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत करत. २२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन या परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली.


जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.


त्यात हिरवा, पिवळा व लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते. 


मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. 


१३ ऑगस्ट १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.


मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला ‘मादाम कामा’ यांचे नाव आहे.


*संदर्भ : विकिपीडिया*


********************************