manojramgude.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे ,

सुस्वागतम्

सुस्वागतम्

Friday, December 11, 2020

बाबू गेनू सैद

 

बाबू गेनू सैद 



जन्म(इ.स. १९०9; महाळुंगे पडवळ ता. आंबेगाव, जि:पुणे
मृत्यू:-डिसेंबर १२इ.स. १९३०मुंबई, महाराष्ट्र) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्‍या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. 12 डिसेम्बर 1930 ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत यात्रेस 20000 हजाराचा जमाव होता. सोनापूर (मुंबई) सम्शण भूमीत तयांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबू गेनूचं जन्मगाव महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे. गेनू कृष्णाजी सैद नावाच्या एका गरीब शेतकऱ्याचा तो मुलगा. त्याचं कुटुंब म्हणजे आई, वडील, दोन ज्येष्ठ बंधू आणि एक बहीण. घरात अठराविश्व दारिद्र्य. त्यांच्याकडे ऐश्वर्याची एकच खूण होती, त्यांचा एक बैल. जो शेती करायला त्यांना मदत करायचा. गेनू सैद हे बाबू दोन वर्षांचा असताना जग सोडून गेले. मग बैल गेला. आणि दारिद्र्याचा अंधार घरभर पसरला. त्या अंधारात किमान एक छोटी पणती पेटवता यावी, म्हणून बाबू गेनूची आई मुंबईत येऊन घरोघरी घरकाम करायला लागली. तिने मुलं चक्क शेजारांच्या जीवावर गावी ठेवली. मुंबईला जाताना तिला केवढा मोठा दगड काळजावर ठेवायला लागला असेल. विचार करा. त्यामुळे बाबू गेनू आणि पुस्तकी शिक्षण याचा दुरान्वयानेही संबंध आला नाही. पण माणूस फक्त पुस्तकातूनच शिकतो असं नाही. हूशार असेल. त्याचं मन संवेदनक्षम असेल. तर जगात वावरताना तो ज्ञानकणं जमवत जातो. बाबू गेनूनेही तेच केलं.

थोडा मोठा झाल्यावर बाबू गेनू मुंबईत आला. आणि गिरणी कामगार झाला. त्याला कधी काम असे, कधी नसे. गिरणीत नाव वडिलांपर्यंत लिहायची पद्धत होती. म्हणून बाबू गेनू सैदचा बाबू गेनू झाला.

तो फिनिक्स मिलच्या चाळीत राहत असे. तिथलं जग आता बदललंय. ती वस्ती आता अब्जाधीशांची आहे. त्यांचा स्वदेशीची संबंध नाही. त्यांना बाबू गेनू आठवत असेल तर ट्रम्प द्वारकानाथ संझगिरीचं लिखाण वाचतात यावर मी विश्वास ठेवायला तयार आहे.

मुंबईच्या वास्तव्यात बाबू गेनू महात्मा गांधीजींच्या चळवळीकडे ओढला गेला. भगतसिंग त्याला स्फूर्ती देत असे. पण महात्माजींच्या अहिंसक मार्गावर त्याचा विश्वास होता. तो काँग्रेसचा चार आण्याचा मेंबर झाला. आजच्या काँग्रेसच्या मंडळींनाही त्याचं नाव ठावूक नसेल. त्याचा रजिस्ट्रेशन क्रमांक होता, 81941. राजकीय कामामुळे तो मोठया भावांच्या लग्नाला जाऊ शकला नाही. आई गेल्यावर तो सर्वस्व ओतायला अधिक मोकळा झाला.

1930 च्या सुमारास महात्माजींनी परदेशी कपड्यांवरच्या बहिष्काराची चळवळ सुरू केली होती. बाबू गेनूला त्यामागचं जागतिक अर्थकारण कळत नव्हतं. त्याला एवढं कळत होतं की, इंग्रज इथला कच्चा माल मँचेस्टरला पाठवतात. आणि तिथल्या मिलमध्ये तयार झालेलं कापड भारतात पाठवून प्रचंड फायदा मिळवतात. इथल्या विणकरांच्या पोटावर आलेला पाय, एकेकाळी निघृण पद्धतीने इंग्रजांनी विणकरांचे तोडलेले हात, गरिबांच्या जाणाऱ्या नोकऱ्या , हे सारं कळण्याइतकी बुद्धिमत्ता बाबू गेनूकडे होती. ब्रिटिशांचा मूळ उद्देश हा आर्थिक लुटालूट आहे. त्यांच्या नाड्या आवळण्यासाठी ही चळवळ आहे, हे त्याला कळत होतं. त्यामुळे परदेशी मालाचे ट्रक अडवणं, परदेशी मालाविरुद्ध चळवळीत भाग घेणं, हे त्याने सुरू केलं. आणि मग तो दिवस उजाडला. 12 डिसेंबर 1930. काळबादेवीच्या मुळजी जेठा मार्केट मधून परदेशी माल ट्रकमधून बाहेर जाणार होता. काँग्रेसचे कार्यकर्ते तिथे जमा झाले. त्यांनी ट्रक अडवले. फ्रेजर नावाच्या एका उद्योगपतीचे ते ट्रक होते. बाबू गेनूच्या पथकाचं नावं होतं तानाजी पथक. त्यांनी ट्रक अडवले. पोलिसांनी त्यांना हुसकावलं. ते पुन्हा ट्रक समोर झोपले. ब्रिटिश पोलीस सार्जंट यांनी, त्यांच्यावरून सरळ ट्रक घेऊन जा. असे आदेश दिले. ट्रक चालवणारा चालक भारतीय होता. काहींच्या मते त्याचं नाव बलविर होतं. काहींच्या मते विठ्ठल धोंडू. त्याने ब्रेक मारला. आणि त्याने सांगितलं " हे माझे देशवासीय आहेत. त्यांच्या अंगावरून मी ट्रक घेऊन जाणार नाही." गोरा पोलीस सार्जंट चिडला. त्याने स्वतः ट्रक चालवायला घेतला. तरी बाबू गेनू डगमगला नाही. तो ट्रक समोर झोपला. त्या निदर्यी सार्जंटने ट्रक त्याच्या अंगावरून नेला. जमाव अक्षरशः आधी दिगमूड झाला आणि मग पेटला. बाबू गेनूला जवळच्या जीटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं. त्याच्या मेंदूला मोठी इजा झाली होती. आणि वयाच्या 22 व्या वर्षी त्याने त्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. 22 हे काय जग सोडण्याचं वय आहे? पण केवढा तो धीरोदात्तपणा. आणि कसं हे जीव तळहातावर घेऊन जगणं. कोरोनाच्या काळात प्रेत घ्यायलाही न जाणाऱ्या नातेवाईकांना वाटणारी जीवाची भीती पाहिली की बाबू गेनूचं धैर्य आभाळाला भेदून वर गेल्यासारखं वाटतं.

त्यानंतर रस्त्यावर जिथे बाबू गेनूचं रक्त सांडलं होतं तिथे जमावाने फुलं टाकली. अचानक ती जागा तीर्थक्षेत्र बनली. बाजूने जाताना लोकं टोपी काढून जावू लागले.

ब्रिटिशांनी मात्र या घटनेची नोंद अपघात अशी केली. ड्रायव्हर बेशुद्ध पडला म्हणून ब्रिटिश सार्जंटने ट्रक स्टेअरिंग हातात घेतलं. त्याचा ताबा सुटला आणि दुर्दैवाने ट्रक बाबू गेनूच्या अंगावरून गेला. त्याला चिरडून टाकण्याचा अजिबात हेतू नव्हता. असं स्पष्टीकरण देण्यात आलं. पण मुंबईच्या जनतेने ते स्पष्टीकरण मानलंच नाही. मुंबई पेटली. जागोजागी परदेशी कपड्यांची होळी झाली. हजारो माणसं प्रेत यात्रेला जमली. त्यांना बाबू गेनूचे अंत्यसंस्कार लोकमान्य टिळकांच्या बाजूला, म्हणजे चौपाटीवर करायचे होते. कसंबसं ब्रिटीश अधिकाऱ्यांनी त्यांना समजावलं. तेव्हा गिरगावच्या स्मशानात त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.